ज्ञानदानाच्या क्षेत्रात दीर्घकाळ निष्ठा, समर्पण आणि गुणवत्तापूर्ण योगदान देणाऱ्या प्राध्यापकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे दिला जाणारा ‘जे. पी. नाईक आदर्श प्राध्यापक पुरस्कार’ यंदा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या स्कूल ऑफ लाइफ सायन्सेसचे संचालक प्रा. डॉ. भूषण लीलाधर चौधरी यांना प्रदान करण्यात आला.

शिक्षक दिनाचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते डॉ. भूषण चौधरी यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

डॉ. भूषण चौधरी यांच्या शैक्षणिक, संशोधनात्मक आणि प्रशासकीय कार्याची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. स्कूल ऑफ लाइफ सायन्सेसचे संचालक म्हणून त्यांनी विद्यार्थीकेंद्रित शिक्षण, संशोधनाला चालना, नवोपक्रम आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले असून, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध संशोधन प्रकल्प व शोधनिबंधांमधून त्यांनी विद्यापीठाचे नाव उंचावले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे आयोजित या सोहळ्यात राज्यभरातील ३२ प्राचार्य व प्राध्यापकांचा त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याबद्दल गौरव करण्यात आला. यावेळी शिक्षण संचालक शैलेश देवगावकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, उच्च व तंत्र शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच विविध विद्यापीठांतील मान्यवर उपस्थित होते.

डॉ. भूषण चौधरी हे जळगाव जिल्ह्यातील खिरोदा येथील मूळ रहिवासी असून, कै. एल. डी. चौधरी यांचे ते सुपुत्र आहेत. विशेष म्हणजे, त्यांचे वडील कै. एल. डी. चौधरी यांनाही सन १९९३ मध्ये राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला होता.

त्यामुळे एकाच कुटुंबातील दोन पिढ्यांच्या शैक्षणिक योगदानाला राज्यस्तरीय सन्मान मिळाल्याने शिक्षण क्षेत्रातील हा प्रेरणादायी वारसा अधोरेखित झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *