• थकीत वेतनासाठी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
  • १५ सप्टेंबरपासून अन्नत्याग आंदोलन
  • २४ ते ५० महिन्यांचे वेतन थकीत
  • २०१९ पासून मागण्यांसाठी पाठपुरावा
  • निवृत्त कर्मचाऱ्यांची देयकेही प्रलंबित
  • वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी

JALGAON | यावल तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन, सेवा विषयक प्रश्न आणि कर्मचाऱ्यांवरील कथित अन्यायाच्या निषेधार्थ १५ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजेपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून लिपिक, पाणीपुरवठा कर्मचारी, सफाई कामगार, ग्रामपंचायत शिपाई आदी पदांवर सेवा बजावत आहेत. विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी २०१९ पासून ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेकडे अनेक अर्ज व निवेदने दिली. मात्र, अद्याप त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
काही कर्मचाऱ्यांचे २४ ते ५० महिन्यांपर्यंत वेतन थकीत असून, अनेकांना नियमितपणे वेळेवर पगार मिळत नाही. तसेच सेवा निवृत्त झालेल्या काही कर्मचाऱ्यांचे आर्थिक हिशोब आणि देय रक्कमही प्रलंबित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या गंभीर प्रश्नाबाबत कर्मचाऱ्यांनी ३१ डिसेंबर २०२५ रोजी सहाय्यक कामगार आयुक्तांकडे लेखी तक्रार केल्याचेही निवेदनात म्हटले आहे. मात्र, त्यानंतरही अपेक्षित कार्यवाही न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
नियमित कामाव्यतिरिक्त कर्मचारी ग्रामपंचायतीची इतर अनेक कामेही करतात. बिल, नोटिसा वाटप, वसुली तसेच विविध प्रशासकीय कामांमध्ये योगदान देत असतानाही हक्काचे वेतन वेळेवर मिळत नसल्याने त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
थकीत वेतनाची मागणी केल्यानंतर काही कर्मचाऱ्यांना नोटिसा देऊन घरी बसविण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून सर्व कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी जळगाव, गटविकास अधिकारी पंचायत समिती यावल, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव, ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ, पोलीस निरीक्षक यावल पोलीस स्टेशन तसेच सहाय्यक कामगार आयुक्त जळगाव यांना माहितीस्तव देण्यात आल्या आहेत.
या आंदोलनात सेवा निवृत्त तसेच कार्यरत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सहभाग दर्शविला असून, छगन सुका साळुंके, प्रदीप एकनाथ जोशी, जगदीश संपत कंडारे, शांताबाई नेमिचंद कंडारे यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या निवेदनावर आहेत.

एनटीव्ही न्यूज मराठी | यावल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *