यावल तालुक्यातील सांगवी बु. गावात भरदिवसा अज्ञात चोरट्याने धाडसी चोरी केली आहे. पाण्याच्या टाकीजवळ उभ्या असलेल्या मालवाहू वाहनातून तब्बल १० क्विंटल लोखंडी सळई लंपास करण्यात आली असून, चोरीच्या मुद्देमालाची किंमत ७१ हजार रुपये आहे.

यावल येथील विरारनगरमधील रहिवासी अनिस अय्यूब पटेल, वय ४५, यांनी यावल पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ते MH-19-BM-3584 या मालवाहू वाहनावर चालक आहेत. ७ सप्टेंबर रोजी दुपारी विश्वास ट्रेडर्सचे मालक अभय जंगले यांनी १० क्विंटल सळई सांगवी बु. येथील पाण्याच्या टाकीजवळ पोहोचवण्यास सांगितले होते.

पटेल दुपारी १.१५ वाजता माल घेऊन सांगवी बु. येथे पोहोचले. पोट दुखत असल्याने त्यांनी वाहन लॉक करून लघुशंकेसाठी गेले. दुपारी १.४५ वाजता परत आल्यानंतर वाहनातील १० क्विंटल सळई गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये १२ एमएमची ३०० किलो सळई, किंमत १८ हजार रुपये; १० एमएमची ३०० किलो सळई, किंमत २१ हजार रुपये; तर ०६ एमएमची ४०० किलो सळई, किंमत ३२ हजार रुपये, असा एकूण ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल आहे.

या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३२९/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५ (क) अन्वये अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल नरेंद्र बागुल पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *