गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर, सुरक्षित आणि वाहतूक कोंडीमुक्त व्हावा, यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर आजपासून अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. खारघर ते सावंतवाडी मार्गावर १६ टन किंवा त्यापेक्षा अधिक वजन क्षमतेच्या अवजड वाहनांना ठराविक कालावधीत बंदी असणार आहे.

गणपती आगमन आणि विसर्जनाच्या काळात तीन टप्प्यांमध्ये हे निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. ११ ते १५ सप्टेंबर, १८ ते २० सप्टेंबर आणि २५ ते २६ सप्टेंबर या कालावधीत अवजड वाहनांना मुंबई-गोवा महामार्गावर प्रवेश करता येणार नाही.

महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी रत्नागिरी आरटीओ विभागाने विशेष पथकं तैनात केली आहेत. कशेडी ते चिपळूण, चिपळूण ते रत्नागिरी आणि रत्नागिरी ते राजापूर अशा तीन टप्प्यांमध्ये आरटीओची सहा पथकं २४ तास कार्यरत राहणार आहेत. कशेडी घाटापासून खारेपाटणपर्यंत महामार्गावर आरटीओकडून २४ तास गस्त घालण्यात येणार आहे.

दरम्यान, जयगड आणि जेएनपीटी बंदरातून आयात-निर्यात मालाची वाहतूक करणारी वाहनं, तसेच दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, औषधं, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन, अन्नधान्य, भाजीपाला आणि इतर नाशवंत व जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना हे निर्बंध लागू राहणार नाहीत.

गणेशोत्सवाच्या काळात महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि लाखो गणेशभक्तांचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, नियमांचं उल्लंघन करणाऱ्या अवजड वाहनांवर आरटीओकडून कारवाई केली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *