जामखेड तालुक्यातील चौंडी येथे गर्दीचा फायदा घेत सोन्याची चैन आणि पेंडल चोरी करणाऱ्या आरोपीचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला आहे. या कारवाईत एका आरोपीला ताब्यात घेत २ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक ३१ मे २०२६ रोजी नवनाथ विष्णु पडळकर, वय ५१, रा. तांबेनगर, बारामती, ता. बारामती, जि. पुणे हे कार्यक्रमासाठी चौंडी, ता. जामखेड येथे आले असता गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन व चैनमधील पेंडल चोरून नेले. याबाबत जामखेड पोलीस स्टेशन गु.र.नं. ३६२/२०२६, बीएनएस कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
पोलीस अधीक्षक अहिल्यानगर मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी शामसुंदर जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर व अमोल आजबे यांचे पथक तयार केले.
९ सप्टेंबर २०२६ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार रेकॉर्डवरील आरोपी राम अर्जुन मुरकुटे, वय ३१, रा. मुर्शदपूर, ता. आष्टी, जि. बीड याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने हा गुन्हा सोमीनाथ कैलास कुसळकर आणि लखन अर्जुन मुरकुटे यांच्यासह केल्याची माहिती दिली. दोन्ही साथीदार फरार आहेत.
चोरीचा मुद्देमाल विकल्याची माहिती मिळाल्यानंतर बीड येथील सोनाराकडून पंचांसमक्ष १६ ग्रॅम वजनाची, २ लाख ४० हजार रुपये किंमतीची सोन्याची लगड जप्त करण्यात आली. आरोपीला पुढील तपासासाठी जामखेड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशन करीत आहे.
