यावल तालुक्यातील मानापुरी आदिवासी पाड्यातील सुपुत्र तथा महाराष्ट्र शासन कृषी विभागातील सहाय्यक कृषी अधिकारी कैलास प्रेमजी बारेला यांना ‘आदिवासी कृषिसेवा गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. आदिवासी आणि शेतकरी बांधवांसाठी केलेल्या कृषी विस्तार कार्याची दखल घेत त्यांचा हा गौरव करण्यात आला.
महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या विविध योजनांचा प्रचार व प्रसिद्धी, शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कृषी विस्तार कार्य, फळबाग लागवड, कृषी यांत्रिकीकरण, सिंचन सुविधा तसेच आधुनिक, जैविक आणि नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी कैलास बारेला यांनी केलेल्या कार्याची दखल दैनिक नवराष्ट्रच्या वतीने घेण्यात आली.
जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, अमळनेरचे आमदार व माजी मंत्री अनिल पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे तसेच दैनिक नवराष्ट्रचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनिवास साहेब यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार आजवरच्या कार्याची पोचपावती आणि भविष्यातील जबाबदारीची जाणीव करून देणारा प्रेरणादायी क्षण असल्याची भावना कैलास बारेला यांनी व्यक्त केली. हा सन्मान त्यांनी आई-वडील, भाऊ, आदिवासी समाजबांधव, शेतकरी वर्ग, कृषी विभागातील सहकारी आणि युवा शेतकरी सहकाऱ्यांना समर्पित केला असून, आधुनिक आणि डिजिटल युगात अधिक जोमाने काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.
