यावल तालुक्यातील नायगाव येथील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आणि शिवतेज नवनिर्माण फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कल्पेश राजेंद्र पवार यांना ‘युवा कर्तृत्व गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. विद्यार्थी, सामाजिक आणि जनहिताच्या कार्याची दखल घेत दैनिक नवराष्ट्रच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला.
जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, अमळनेरचे आमदार व माजी मंत्री अनिल पाटील, जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे तसेच दैनिक नवराष्ट्रचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनिवास साहेब यांच्या हस्ते कल्पेश पवार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या तरुणाच्या कार्याची दखल घेत हा सन्मान दिल्याबद्दल कल्पेश पवार यांनी नवराष्ट्र परिवाराचे आभार व्यक्त केले. हा पुरस्कार केवळ सन्मान नसून आजवरच्या कार्याची पोचपावती आणि भविष्यातील जबाबदारीची जाणीव करून देणारा प्रेरणादायी क्षण असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
हा पुरस्कार त्यांनी आई-वडील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, मार्गदर्शक अमित ठाकरे, पत्नी वैशाली पवार तसेच युवा सहकाऱ्यांना समर्पित केला. समाजातील विद्यार्थी, युवा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी अधिक जोमाने काम करण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला.
