शेवगावातील वरूर चौक–आखेगाव रोड परिसरात किरकोळ वादातून पिता-पुत्राला शिवीगाळ, दमदाटी आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. यावेळी वडिलांच्या पोटात चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याप्रकरणी शेवगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय फडके, त्यांचा मुलगा रोहन संजय फडके, ओम वाळके, राजू धनवडे आणि कृष्णा धनवडे यांच्याविरुद्ध शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परशुराम मच्छिंद्र कोरडे (वय २०, रा. कोरडे वस्ती, शेवगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला. पोलिस नोंदीनुसार, १५ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास आरोपी एकत्र जमले. फिर्यादी व त्यांच्या वडिलांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.

यावेळी रोहन संजय फडके याने हातातील चाकूने फिर्यादीचे वडील मच्छिंद्र रामनाथ कोरडे यांच्या पोटात वार केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या हल्ल्यात मच्छिंद्र कोरडे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील साईदीप हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

गुन्हा रजिस्टर क्रमांक ७३९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नोंदीनुसार आरोपी अद्याप अटकेत नाहीत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करीत आहेत.

आयाज शेख | एनटीव्ही न्यूज मराठी | शेवगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *