खासगी रुग्णालयांमध्ये आकारल्या जाणाऱ्या वैद्यकीय साहित्याच्या वाढीव दरांचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हा मुद्दा उपस्थित करत केंद्र सरकारकडे कारवाईची मागणी केल्यानंतर आता कल्याण-डोंबिवलीत त्यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात आली आहे.
या बॅनर्सवर तुकाराम मुंढे यांचा फोटो आणि वैद्यकीय साहित्याचे खरेदी दर, तसेच रुग्णांकडून आकारले जाणारे बिलाचे दर नमूद करण्यात आले आहेत.
११ रुपये ५ पैशांचा सलाईन सेट ३२५ रुपयांना आकारला जात असल्याचा दावा बॅनरवर करण्यात आला आहे. यासोबतच सिरिंज आणि कॅथेटरच्या दरांमध्येही मोठी तफावत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
‘नेमकी कशी होतेय रुग्णांची लूट?’ असा सवाल उपस्थित करत कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांनी तुकाराम मुंढे यांच्या भूमिकेला समर्थन दिलं आहे.
