किनगाव बु. येथे गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा जपत उत्सवाला विधायक स्वरूप देणाऱ्या गणेश मित्र मंडळांच्या अध्यक्षांचा संकल्प फाउंडेशनतर्फे सन्मान करण्यात आला. अध्यक्षांना सन्मानचिन्ह प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजातील एकोपा, बंधुभाव आणि सामाजिक सलोखा वाढविणारा उत्सव ठरावा, यासाठी विविध गणेश मित्र मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. त्यांच्या योगदानाची दखल घेत संकल्प फाउंडेशनच्या वतीने हा विशेष सन्मान करण्यात आला.

मंडळांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम, स्वच्छता, शिस्त, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच समाजोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या अध्यक्षांचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.

यावेळी संकल्प फाउंडेशनचे अध्यक्ष संजय सयाजीराव पाटील, उपाध्यक्ष मनोज नामदेव मोरे, सचिव, संचालक मंडळ व कार्यकारी सदस्य उपस्थित होते.

गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजात एकोपा आणि सामाजिक बांधिलकी वाढविणाऱ्या मंडळांच्या कार्याचा सन्मान होणे ही अभिमानाची बाब असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

संकल्प फाउंडेशनच्या या उपक्रमाचे गणेश मंडळांच्या अध्यक्षांसह नागरिकांनी स्वागत केले. ‘गणेशोत्सवातील कर्तृत्वाचा सन्मान, सामाजिक कार्याला नवी प्रेरणा’ असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *