YAWATMAL | उमरखेड शहरात तडीपार आदेशाचे उल्लंघन करून वावरणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीवर उमरखेड पोलिसांच्या डी.बी. पथकाने कारवाई केली आहे. लेंडी पुलावर सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

दिनांक २३ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री गणेशोत्सवाच्या अनुषंगाने उमरखेड पोलीस स्टेशनचे डी.बी. पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. यावेळी डी.बी. प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, उमरखेड येथील शेख तेहमीर उर्फ तम्या शेख समीर हा तडीपार आदेशाचे उल्लंघन करून शहरात वावरत आहे.
माहितीच्या आधारे डी.बी. पथकाने दोन पंचांसह शोधमोहीम राबवली. लेंडी पुलावर सदर इसम आढळून आल्यानंतर सापळा रचून त्याला शिताफीने ताब्यात घेण्यात आले. शेख तेहमीर उर्फ तम्या शेख समीर, वय २२ वर्षे, रा. आंबेडकर वॉर्ड, उमरखेड, याच्यावर उपविभागीय दंडाधिकारी, उमरखेड यांच्या कार्यालयीन आदेशानुसार यवतमाळ, नांदेड, हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यांतून दिनांक ०२/०४/२०२६ पासून दोन वर्षांसाठी तडीपार/हद्दपार आदेश देण्यात आला होता.
या आदेशाचे उल्लंघन केल्याने पंचांसमक्ष पंचनामा करून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम १४२ नुसार कारवाई करण्यात आली असून, उमरखेड पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक ९१७/२०२६, दिनांक २३/०९/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार प्रकाश बोंबले करीत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी गुरव कायंदेपाटील आणि पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, सहायक फौजदार विजय पतंगे, पोलीस हवालदार चंदन जाधव, प्रकाश बोबले, संदिप ठाकुर, पोलीस कॉन्स्टेबल विष्णू राठोड, दिगांबर गिते, संघशिल टेंभरे आणि निवृत्ती महाळनवर यांनी यशस्वीरित्या पार पाडली.


उमरखेड, प्रतिनिधी



#Umarkhed #Yavatmal #UmarkhedPolice #YavatmalPolice #BreakingNews #MaharashtraNews #MarathiNews

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *