JALGAON | यावल तालुक्यातील किनगाव आणि मालोद शेतशिवारात विद्युत वितरण कंपनीच्या तारांची चोरी करताना चोरट्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी कारवाई करत एकूण ११ संशयितांना मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.
किनगाव तालुक्यातील किनगाव आणि मालोद गावांच्या शेतशिवारात विद्युत वितरण कंपनीचे तार चोरी करून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रकार समोर आला. मंगळवारी रात्री चोरटे किनगाव येथील एका भंगार व्यावसायिकाला तार देत असताना शेतकऱ्यांनी त्यांना रंगेहात पकडून पोलिसांना माहिती दिली.
पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, सहाय्यक फौजदार वसंतराव बेलदार, हवालदार संदीप सूर्यवंशी, किशोर परदेशी आणि सचिन पाटील यांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून सुपडू हमजान तडवी वय ३३, रा. मालोद, हल्ली मुक्काम काजीपुरा सावदा, ता. रावेर, करीम नशीर तडवी वय २४, रा. तडवी वाडा नायगाव, अलाउद्दीन मजीद तडवी वय २३, रा. दर्ग्याजवळ नायगाव आणि भंगार व्यावसायिक आरिफ युसुफ मन्यार वय ४२, रा. सोनार गल्ली, किनगाव बुद्रुक यांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून लघुदाब, ११ के.व्ही.ए. आणि ३३ के.व्ही.ए.चे कटिंग केलेले मोठ्या प्रमाणावर विद्युत तार मिळून आले. तसेच चारचाकी वाहनही हस्तगत करण्यात आले. या चौघांना अनिल उर्फ शेखर आत्माराम चौधरी, रा. साकळी यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली आहे.
यानंतर पोलिसांनी सर्च मोहीम राबवत केबल चोरीच्या गुन्ह्यात संशयित म्हणून मालोद येथून आरिफ तडवी, हैदर तडवी, अफसर तडवी, कुदबुद्दीन तडवी, विनोद तडवी, सलीम तडवी आणि एका १७ वर्षीय अल्पवयीन अशा सात जणांना ताब्यात घेतले. त्यामुळे एकूण ११ संशयित सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार वसंतराव बेलदार करीत आहेत.
प्रतिनिधी | एनटीव्ही न्यूज मराठी | यावल
#Yawal #Kinagaon #Malod #JalgaonNews #YawalNews #CableChori #ElectricityCable #CrimeNews #PoliceAction #BreakingNews #MaharashtraNews #NTVNewsMarathi #NTVNews #LatestNews #ViralNews
