JALGAON | चोपडा तालुक्यातील मौजे सनपुले येथील शासकीय जमिनीवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या आदिवासी भिल्ल आणि पावरा समाजातील पात्र कुटुंबांच्या निवासी हक्कांचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली आहे. भीम आर्मी भारत एकता मिशनच्या वतीने प्रशासनाला जनहित निवेदन देण्यात आले आहे.
सनपुले येथील गट क्रमांक 30 (1) व 30/2 (अ) मधील शासकीय जमिनीवर अनेक आदिवासी भिल्ल कुटुंबे अनेक वर्षांपासून वास्तव्यास असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. संबंधित कुटुंबांनी स्वतःच्या श्रमातून घरे उभारून तेथे स्थिर वास्तव्य केले आहे. या निवासी अतिक्रमणांचे शासनाच्या लागू कायदे, नियम व धोरणांनुसार सर्वेक्षण करून पात्र कुटुंबांना निवासी हक्क देण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच जागाविहीन पात्र व गरजू कुटुंबांना नियमानुसार निवासी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी अंजली बर्गे व नायब तहसीलदार योगेश पाटील यांच्याकडे करण्यात आली. हे निवेदन भीम आर्मी भारत एकता मिशनचे चोपडा तालुका अध्यक्ष मुबारक तडवी व प्रसिद्धी प्रमुख राहुलजयकार यांनी सादर केले.
ग्रामपंचायतीमार्फत 2024, 2025 आणि 2026 मध्ये तहसील कार्यालय, चोपडा येथे पत्रे सादर करण्यात आली होती. मात्र, अद्याप अपेक्षित कार्यवाही झालेली नसल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे यापूर्वीच्या अर्ज व पत्रांवर झालेल्या कार्यवाहीचा लेखी अहवाल देऊन तातडीने चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
संबंधित कुटुंबांचे स्थळपंचनामा, सर्वेक्षण व मोजणी करून वास्तव्याचा कालावधी, घरांचे अस्तित्व आणि पात्रतेशी संबंधित बाबींची प्रत्यक्ष स्थळपाहणी करावी. ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा घेऊन आवश्यक ठराव मंजूर करावा, तसेच पात्र कुटुंबांच्या निवासी अतिक्रमणांचे नियमितीकरण सुरू करावे, अशी मागणी आहे.
ज्यांच्याकडे निवासी जागा नाही, अशा पात्र व गरजू आदिवासी भिल्ल कुटुंबांचे स्वतंत्र सर्वेक्षण करून उपलब्ध शासकीय जमिनीवर नियमानुसार जागा द्यावी. पात्र कुटुंबांना घरकुल, वीज, पाणी, रस्ता आणि इतर पात्र शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा, तसेच प्रक्रिया पारदर्शकपणे राबवावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदन प्राप्त झाल्यापासून सात दिवसांत कार्यवाहीचा लेखी अहवाल देण्याची मागणी करण्यात आली आहे. मागण्यांवर ठोस व कायदेशीर कार्यवाही न झाल्यास 12 ऑक्टोबर 2026 रोजी पंचायत समिती कार्यालय चोपडा, तहसील कार्यालय चोपडा, जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव तसेच आवश्यकतेनुसार विभागीय आयुक्त कार्यालयासमोर संविधानिक व लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
हे आंदोलन भीम आर्मी भारत एकता मिशनचे जळगाव जिल्हा अध्यक्ष आयु. गणेशजी सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. धरणे आंदोलन, बेमुदत धरणे आणि विशाल मोर्चासह इतर कायदेशीर व लोकशाही मार्गांचा अवलंब करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
वार्ताहराचे नाव | एनटीव्ही न्यूज मराठी | चोपडा
#Chopda #Sanpule #JalgaonNews #AdivasiNews #AdivasiRights #BhillaSamaj #PawaraSamaj #ResidentialRights #TribalRights #ChopdaNews #Jalgaon #MaharashtraNews #BreakingNews #NTVNewsMarathi #NTVNews #LatestNews #MaharashtraBreakingNews
