जळगाव जिल्ह्यात पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सातपुडा पर्वतातील अतिदुर्गम मोहमांडली येथे गरजू आदिवासी कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. शेती आणि मोलमजुरीवर उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांना अडचणीच्या काळात आधार देण्यासाठी पाडळसे येथील तरुणांनी हा उपक्रम राबविला.
राज्यात आणि जळगाव जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम भागात राहणाऱ्या आणि शेती-मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आदिवासी बांधवांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर मोहमांडली येथे गरजू नागरिक आणि कुटुंबांना धान्य, तेल तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमात पाडळसे येथील देवेंद्र खैरनार, संकेत भाई, निलेश पाटील, शुभम भोई, उमेश कोळी तसेच मोहमांडलीचे पोलीस पाटील फारुख तडवी यांनी सहभाग घेतला.
अतिदुर्गम भागातील आदिवासी नागरिकांना संकटाच्या काळात आधार मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. गरजूंच्या मदतीला धावून जाणे हीच खरी माणुसकी असून, नागरिक आणि समाजसेवी संघटनांनी आपापल्या परीने गरजूंना शक्य ते सहकार्य करावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र खैरनार यांनी केले.
या मदतीमुळे गरजू आदिवासी कुटुंबांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असून, पाडळसे येथील तरुणांनी राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
