♦️ गेट-टुगेदरदरम्यान रेल्वे पोलिसाचा दुर्दैवी मृत्यू
♦️ स्विमिंग पूलमध्ये घडली गंभीर दुर्घटना
♦️ सचिन आवारी यांच्या डोक्याला मार
♦️ नऊ बॅचमेट आले होते एकत्र
♦️ बाल गिरी फार्मवर घडली घटना
♦️ कुही पोलिसांकडून पुढील तपास सुरू

NAGPUR | गणेशोत्सवानंतर गेट-टुगेदरसाठी एकत्र आलेल्या २०१३ च्या जीआरपी बॅचमधील नऊ मित्रांवर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला. स्विमिंग पूलमध्ये उडी मारताना डोक्याला जोराचा मार लागल्याने रेल्वे पोलीस दलातील सचिन घनश्याम आवारी, वय ३८, यांचा मृत्यू झाला. ही घटना कुही तालुक्यातील मौजा सोनेगाव शिवारातील बाल गिरी फार्म येथे ३० सप्टेंबरच्या मध्यरात्री घडली.

सचिन आवारी हे गायत्री नगर, सचिन लेआऊट, झिंगाबाई टाकळी, मानकापूर, नागपूर येथील रहिवासी होते.
२०१३ मध्ये जीआरपी रेल्वे पोलीस दलात एकत्र भरती झालेले राहुल हरीचंद्र राजगिरे, विपीन पिलेवान, नितुल सावजी, शिवशंकर बिसेन, निलेश निकोडे, यशवंत गायकवाड, देवेंद्र राकेश, प्रतिक ईटनकर आणि सचिन घनश्याम आवारी हे नऊ बॅचमेट दरवर्षी गेट-टुगेदर करत होते. यावर्षी गणेशोत्सवामुळे विसर्जनानंतर गेट-टुगेदर करण्याचे ठरले होते.
त्यानुसार सर्व नऊ मित्र तीन चारचाकी वाहनांतून रात्री सुमारे ९ वाजता नागपूरहून निघाले. रात्री अंदाजे १० वाजून १५ मिनिटांनी ते सोनेगाव शिवारातील बाल गिरी फार्मवर पोहोचले. तेथे सर्वांनी मिळून जेवण तयार केले. त्यानंतर मित्र स्विमिंग पूलमध्ये पोहत एकत्र वेळ घालवत होते.
दरम्यान, रात्री १.३० ते १.४५ वाजताच्या सुमारास सचिन आवारी यांनी स्विमिंग पूलमध्ये उडी मारली. यावेळी त्यांच्या डोक्याला जोराचा मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद आहे.
या घटनेची नोंद कुही पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १९४ अन्वये मर्ग म्हणून करण्यात आली आहे. घटनेची नोंद पोहवा प्रशांत खडतकर यांनी घेतली असून, पुढील तपास पोहवा हरिदास चाचेरकर करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *