स्वर्गीय हरिभाऊ माधव जावळे यांच्या जयंतीनिमित्त फैजपूर येथे रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांसाठी अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले. दुष्काळ, जलसंधारण, पर्यावरण संवर्धन आणि लोकसहभागातून गावपातळीवर रचनात्मक काम उभे करण्याबाबत यावेळी विचारमंथन करण्यात आले.

फैजपूर येथील शुभ दिव्य लॉन येथे झालेल्या अभ्यास वर्गाला भाजपा महाराष्ट्र प्रदेशचे माजी संघटनमंत्री रवींद्र भुसारी, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेंद्र नन्नवरे, भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, फैजपूर मंडळ अध्यक्ष उमेश बेंडाळे आणि फैजपूर शहराध्यक्ष चंद्रकांत जाधव उपस्थित होते. चंद्रकांत बाविस्कर, माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती हर्षल पाटील आणि सुरेश धनके यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन के. जी. पाटील यांनी केले.

रवींद्र भुसारी यांनी कार्यकर्त्यांची भूमिका आणि स्व. हरिभाऊ जावळे यांच्या कार्याचा वारसा यावर मार्गदर्शन केले. स्व. हरिभाऊ जावळे यांनी शेती, माती, पाणी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून विविध प्रकल्प व योजना राबविल्याचे त्यांनी सांगितले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हरिभाऊंची अपूर्ण कामे पूर्ण करण्याची दिशा आमदार अमोल जावळे यांच्या कार्यातून पुढे जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.

राजेंद्र नन्नवरे यांनी रावेर-यावल परिसरातील जलसंकटाची गंभीरता मांडली. भूजलाचा वाढता उपसा, अपुरे पुनर्भरण आणि पावसातील अनिश्चिततेमुळे जलव्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर होत असल्याचे त्यांनी सांगितले. नागपूर जिल्ह्यातील अरोली-मौदा येथील सामूहिक शेतीचा प्रयोग, हिवरे बाजारचे पोपटराव पवार, बारीपाडाचे चैत्राम पवार, राहीबाई पोपरे यांची बीजबँक आणि मियावाकी घनवन प्रकल्प यांची माहिती देत, प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या गावात दुष्काळ, जलसंधारण, पर्यावरण आणि शेतीशी संबंधित रचनात्मक उपक्रम राबवावेत, असे आवाहन केले.

दुष्काळावर मात करण्यासाठी जाणीव, लोकसहभाग आणि प्रत्यक्ष कृती या त्रिसूत्रीवर गावपातळीवर काम उभे करण्याची दिशा या अभ्यास वर्गातून देण्यात आली. यावेळी माजी खासदार उल्हास पाटील, माजी आमदार अरुण पाटील, आमदार अमोल जावळे, विधानपरिषद सदस्य नंदकिशोर महाजन यांच्यासह रावेर-यावल तालुक्यातील विविध लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *