यावल तालुक्यात दुष्काळामुळे पिकांची स्थिती अत्यंत बिकट झाली असून, शासनाने पंचनामे न करता सरसकट दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

शासनाने राज्यात दुष्काळ जाहीर केल्यानंतर पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र पंचनामे करताना अनेक शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. वस्तुस्थिती पाहता सर्व पिके जमीनदोस्त झाली असल्याने पंचनाम्याची गरज नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांना आपली कामे सोडून अधिकाऱ्यांसोबत शेतात जावे लागते. त्यामुळे त्यांचा एक-दोन दिवसांचा वेळ जातो. काही शेतकरी बाहेरगावी किंवा महत्त्वाच्या कामासाठी बाहेर असतात. तसेच अटी-शर्तीनुसार शेतकरी स्वतः शेतात उपस्थित असणे आणि गुगलवर फोटो काढणे, अशा अटी जाचक असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

या अटी शिथिल करून सरसकट दुष्काळग्रस्तांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. सध्या उष्णतेची लाट वाढल्याने पिकांची स्थिती आणखी बिकट झाली असून, सर्व पिके हातातून गेल्याने शेतकरी हैराण झाला आहे.

यावल तालुक्याच्या उत्तर-पश्चिम भागात हलक्या प्रतीची जमीन असल्याने शेतजमिनीतील पिकांची वाढ खुंटली आहे. पाण्याच्या पातळीतही घट होत असल्याने रब्बी हंगामही हातातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *