जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २०२५ ते २०३१ पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रारूप मतदार यादीवर हरकत घेण्यात आली आहे. यावल तालुका शेतकरी खरेदी-विक्री संघाचे संचालक अतुल वसंत पाटील यांनी ही हरकत नोंदवली असून, यावर ७ ऑक्टोबर रोजी नाशिक येथे सुनावणी होणार आहे.
या हरकतीवर सुनावणीसाठी विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक विभाग यांनी ७ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता नाशिक येथील गृहनिर्माण भवन, गडकरी चौक येथे सुनावणी आयोजित केली आहे.
या सुनावणीस जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी जळगाव, तालुका सहकारी निवडणूक अधिकारी यावल, सचिव यावल खरेदी-विक्री संघ, जिल्हा उपनिबंधक, यावल तालुका उपनिबंधक कार्यालयाचे अधिकारी तसेच जिल्हा बँक निवडणूक अधिकारी आणि संबंधित प्रतिवादी यांना आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गैरहजर राहिल्यास एकतर्फी निर्णय घेण्यात येईल, असे नोटीसमध्ये नमूद आहे.
या हरकतीमुळे यावल तालुका खरेदी-विक्री संघाच्या राजकारणात चर्चेला उधाण आले असून, आता ७ ऑक्टोबरच्या सुनावणीकडे यावल तालुक्याचे लक्ष लागले आहे.
