यावल पोलीस स्टेशन हद्दीतील किनगाव बुद्रुक येथे गावठी देशी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या तरुणाला यावल पोलिसांनी अटक केली आहे. पवन कैलास सोनवणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याविरुद्ध आर्म्स अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आगामी सण-उत्सवाच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारचा गंभीर गुन्हा घडू नये, यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि फैजपूर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांनी नाकाबंदी व सतत पेट्रोलिंग करून गुन्हेगारांची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

त्या अनुषंगाने ०३/१०/२०२६ रोजी दुपारी ०३.३० वाजता स्थानिक गुन्हे शाखा जळगाव येथील पोलीस उपनिरीक्षक श्री. सोपान गोरे व त्यांचा स्टाफ यावल पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे प्रकटीकरणाचे काम करीत होते. यावेळी पवन सोनवणे, रा. किनगाव, हा स्वतःजवळ देशी कट्टा बाळगून असल्याची गुप्त माहिती मिळाली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक धारबळे यांच्या सूचनेवरून पोलीस उपनिरीक्षक गोरे, यावल पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मैत्रुद्दीन सय्यद आणि पोलीस कॉन्स्टेबल हितेश बागुल यांनी किनगाव परिसरात सापळा लावून कारवाई केली.

३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता चोपडा हायवेवर किनगाव गावाच्या अलीकडे हॉटेल श्रीसमोर पवन कैलास सोनवणे, वय २५ वर्षे, रा. किनगाव बु., ता. यावल, जि. जळगाव, याला ताब्यात घेण्यात आले. अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला लावलेले एक लोखंडी देशी बनावटीचे पिस्तुल अर्थात कट्टा आणि पँटीच्या खिशात दोन जिवंत काडतुसे मिळून आली. त्यानंतर सदर ठिकाणी जप्तीची कारवाई करण्यात आली.

पोलिस कॉन्स्टेबल सचिन रघुनाथ युगे यांच्या फिर्यादीवरून पवन सोनवणे याच्याविरुद्ध यावल पोलीस स्टेशन गु.र.नं. ३५६/२०२६, भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५(१-B)(a) अन्वये ०३/१०/२०२६ रोजी रात्री ०८.२० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या देखरेखीखाली स्थानिक गुन्हे शाखा जळगाव येथील पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोकॉ २५३४ सलीम तडवी, पोकॉ ५९८ मयुर निकम, पोकॉ ८७८ सचिन युगे तसेच यावल पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मैत्रुद्दीन सय्यद आणि पोकॉ २२६ हितेश बागुल यांनी केली आहे.

आरोपी पवन कैलास सोनवणे यास अटक करण्यात आली असून, त्यास ०४/१०/२०२६ रोजी यावल येथील न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *