यावल तालुक्यातील राजोरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पारंपरिक भुलाबाई सण ज्ञानोत्सव म्हणून साजरा करण्यात आला. संस्कृतीचा वारसा जपत विद्यार्थ्यांनी भुलाबाईच्या गाण्यांसह टिपरी, गरबा आणि फुगडीचा आनंद घेतला.

दि. ३ ऑक्टोबर २०२६ रोजी जि. प. प्रा. शाळा राजोरे येथे संस्कृतीचा वारसा जपणारा पारंपरिक भुलाबाई सण ज्ञानोत्सव म्हणून साजरा करण्यात आला. भुलाबाईच्या गाण्यांवर मुलींसोबत मुलांनीही सहभाग दर्शवत टिपरी, गरबा आणि फुगडीचा मनमुराद आनंद लुटला.

भुलाबाईसाठी आणलेल्या खाऊची ओळख त्याच्या होणाऱ्या ध्वनीनादातून आणि येणाऱ्या सुगंधातून करून घेत विद्यार्थ्यांनी जणू विज्ञान विषयाशी मैत्री करत पदार्थांची नावे सांगितली.

कार्यक्रमात राजगिरा लाडू, शेंगदाणा बर्फी, फुटाणे, हरभरे, मखाने, लाह्या, चना उसळ, मुगडाळ, मुग, सोयाबीन तसेच परसबागेतील भेंडी, मिरची, सीताफळ, काकडी आणि गवार या पौष्टिक अन्नाचा समावेश करण्यात आला.

पौष्टिक अन्नाचे शरीरासाठी असलेले महत्त्व आणि आहारातील त्याचा समावेश याबाबत रविंद्र पाटील सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संस्कृतीची जपवणूक करताना विज्ञानाला हाक देऊन नाद-सुगंधातून पौष्टिकतेचे धडे घेत भुलाबाईच्या अंगणी ज्ञानोत्सव साजरा करून आनंददायी शिक्षणाचा आपण सर्वजण ध्यास धरूया, असे श्रीमती वैशाली पाटील यांनी मत मांडले.

यावेळी गावच्या सरपंच पुष्पा पाटील, व्यवस्थापन समिती सदस्या माधुरी कोळी, लताताई सोनवणे आणि पूजा बिऱ्हाडे उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *