यावल तालुक्यातील आमोदा येथे भाजपा दिव्यांग आघाडीच्या वतीने दिव्यांगांसाठी मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध शासकीय योजनांची माहिती देत लाभार्थ्यांचे अर्ज भरण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव जिल्हा पूर्व अपंग संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण पाटील नायगाव आणि संतोष भाऊ शिवलकर यांनी या शिबिराचे आयोजन केले.
यावेळी संजय गांधी योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी योजना, राष्ट्रीय कुटुंबलाभ योजना, दिव्यांगांसाठी जिल्हा परिषद भांडवल अंतर्गत दीड लाख रुपये २० टक्के सबसिडीनुसार योजना, तसेच विविध महामंडळांच्या उद्योजकांसाठी ३ ते ५ लाख रुपये कर्ज योजना, महिला व बालकल्याण, कामगार कार्यालय, घरकुल, दिव्यांग बचतगट, बालसंगोपन योजना आणि सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठीच्या योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
दिव्यांग बांधव, बेरोजगार तरुण आणि महिला सक्षमीकरणासाठी अधिकाधिक योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न भाजपा सरकार करीत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावल-रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे हेही गरजू लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असल्याचे नमूद करण्यात आले.
लाभार्थ्यांची विविध योजनांसाठी नोंदणी करण्यात आली. तसेच माता भवानी दिव्यांग स्वयं सहायता बचत गटाची स्थापना करण्यात आली. भाजपा फैजपूर मंडल भाजपा दिव्यांग आघाडी अध्यक्ष म्हणून संतोष एकनाथ शिवलकर यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली असून, आमदार अमोल हरीभाऊ जावळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात येणार असल्याचे अरुण पाटील यांनी सांगितले.
दिव्यांग बांधवांचे सक्षमीकरण आणि पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी गावनिहाय शिबिरे आयोजित करण्याचा निर्धारही अरुण पाटील यांनी व्यक्त केला. निखिल सपकाळे यांनी दिव्यांगांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी लक्ष्मण पाटील, राकेश शिवलकर, सुरेश चौधरी, सुनिता भंगाळे, चितामण सपकाळे, जिजाबाई शिवलकर, सुनिता चौधरी, मोहिनी पाटील यांच्यासह गावातील बहुसंख्य लाभार्थी उपस्थित होते. संतोष भाऊ शिवलकर यांनी आभार मानत कार्यक्रमाचा समारोप केला.
