यावल तालुक्यातील राजोरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ‘पितृस्मृती कृतज्ञता सोहळा २०२६’ पार पडला. मुंबई येथील माजी सैनिक सुधाकर लक्ष्मण सोनवणे यांनी पूर्वजांच्या स्मृती जपत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स शूज आणि सॉक्सचे मोफत वाटप केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच पुष्पा गिरधर पाटील होत्या. माजी सैनिक सुधाकर सोनवणे यांनी मुंबईहून व्हिडिओ कॉलद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या.
यावेळी लताताई सोनवणे, माधुरी योगेश कोळी, योगेश कोळी, राजेंद्र महाजन, दिलीप महाजन आणि पूजाताई बिऱ्हाडे उपस्थित होते. मुख्याध्यापक रवींद्र पाटील यांनी प्रास्ताविक करताना, “आपल्या पूर्वजांचे स्मरण करताना समाजातील घटकांना मदत करणे हीच खरी कृतज्ञता आहे,” असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार वैशाली पाटील यांनी मानले. नवीन शूज आणि सॉक्स मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
