यावल वन्यजीव सप्ताहानिमित्त यावल वन्यजीव अभयारण्यात पक्षी निरीक्षण करत असताना आकर्षक आणि दुर्मिळ स्थलांतरित पक्षी युरोपियन निळकंठाची नोंद झाली. या पक्ष्याच्या दर्शनामुळे पक्षीप्रेमी आणि निसर्ग अभ्यासकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

निळसर-हिरव्या रंगाची झळाळी, तपकिरी छटा आणि उड्डाण करताना दिसणारी वैशिष्ट्यपूर्ण पंखांची हालचाल यामुळे युरोपियन निळकंठ हा अतिशय आकर्षक पक्षी मानला जातो. महाराष्ट्रात हा दुर्मिळ स्थलांतरित पाहुणा म्हणून विशेष महत्त्वाचा आहे.

वन्यजीव सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर यावल अभयारण्यात या पक्ष्याची झालेली नोंद ही येथील समृद्ध जैवविविधता आणि विविध पक्ष्यांसाठी पोषक असलेल्या नैसर्गिक अधिवासाचे महत्त्व अधोरेखित करणारी आहे.

यावलच्या जंगलात विविध स्थानिक तसेच स्थलांतरित पक्ष्यांचे वास्तव्य आणि अधूनमधून होणारे दर्शन हे निसर्गप्रेमी व पक्षी निरीक्षकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. यामुळे यावल अभयारण्याच्या जैवविविधतेचे संवर्धन आणि संरक्षण करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *