यावल तालुक्याच्या सीमेवर असलेल्या कोळन्हावी वन तपासणी नाक्यावर वन विभागाने धडक कारवाई केली आहे. विनापरवाना लाकूड वाहतूक करणाऱ्या टाटा ७०९ ट्रकसह एकूण तीन लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल वन विभागाने जप्त केला आहे.
यावल पश्चिम वन विभागाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ५ ऑक्टोबर रोजी कोळन्हावी वननाका येथे तपासणी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी टाटा ७०९ ट्रक क्रमांक एमएच ०३ एन ५३०५ थांबवला. वाहनाची तपासणी केली असता त्यातून विनापरवाना लाकूड वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले.
वन विभागाने ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये ५ घनमीटर जळाऊ लाकूड आढळले. या लाकडाची किंमत १० हजार रुपये, तर वाहनाची किंमत ३ लाख रुपये असून, एकूण ३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमाल पावतीने मु.वि. केंद्र, यावल येथे जमा करण्यात आला आहे.
सदर वन गुन्ह्याचा पुढील तपास टी. वाय. देवरे, वनपाल वाघझिरा करीत आहेत.
ही कारवाई सौरिष सहाय, उप वनसंरक्षक, यावल वनविभाग जळगाव, एस. ए. पाटील, सहाय्यक वनसंरक्षक यावल प्रादेशिक व कॅम्पा, तसेच पी. डी. जोशी, वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पश्चिम विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली टी. वाय. देवरे, वनपाल वाघझिरा, रविकांत नगराळे, वनरक्षक निंबादेवी उत्तर, श्रीमती एस. पी. भालेराव, वनरक्षक हरिपुरा आणि वाहनचालक शरद पाटील यांनी केली.
