राज्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असताना दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देगलूर-बिलोलीचे आमदार जितेश रावसाहेब अंतापूरकर पुढे सरसावले असून, त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये २ लाख ४५ हजार रुपयांचा धनादेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी आमदार अंतापूरकर यांनी भेट घेऊन हा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या मदतीचा स्वीकार करत आमदार अंतापूरकर यांचे आभार मानले, अशी माहिती आमदारांच्या स्वीय सहाय्यकांनी दिली आहे. यावर्षी मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागात पावसाने दडी मारल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून शेतीसोबतच चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाकडून सुरू असलेल्या मदत कार्याला हातभार म्हणून आमदार अंतापूरकर यांनी स्वतः पुढाकार घेत ही मदत केली आहे. नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या त्यांच्या या कृतीबद्दल मतदारसंघासह सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

दादाराव इंगळे | एनटीव्ही न्यूज मराठी | नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *