नागपूर-पांढुर्णा मार्गावरील सालई फाट्याजवळ फॉर्च्युनर कार आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे सालई फाट्यावर उड्डाणपूल उभारण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.

नागपूर-पांढुर्णा मार्गावरील उमरीपासून अर्ध्या किलोमीटर अंतरावर असलेल्या सालई फाट्याजवळ शनिवारी फॉर्च्युनर कार आणि दुचाकीमध्ये जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघाताची माहिती परिसरात पसरताच घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमली.

मिळालेल्या माहितीनुसार, फॉर्च्युनर कार क्रमांक MH-31-FR-9561 नागपूरहून पांढुर्ण्याच्या दिशेने जात होती, तर दुचाकी क्रमांक MH-40-DF-3287 सालई फाट्याजवळून नागपूरच्या दिशेने जात होती. याचदरम्यान दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली. दुचाकीवर प्रवास करणारे पती-पत्नी गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि केळवद पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमींना सावनेर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.

या अपघातात डोमाजी धुंदे (वय ६५ वर्षे) आणि त्यांच्या पत्नी प्रमिला डोमाजी धुंदे (वय ४९ वर्षे) यांचा मृत्यू झाला. डोमाजी धुंदे हे पोलीस विभागातून सेवानिवृत्त झाले होते, अशी माहिती मिळाली आहे. पती-पत्नीचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर, नातेवाईकांवर आणि परिचितांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून, पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

सालई फाटा बनला अपघातप्रवण मार्ग

सालई फाट्याजवळ वडन मार्ग असल्याने या परिसरात सातत्याने अपघात होत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. दर आठवड्याला आणि महिन्याला होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. या मार्गावर वाहनांची सतत वर्दळ असते. फाट्यावरून जाणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने वाहतूक सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी अपघात होत आहेत. उड्डाणपूल उभारण्यात यावा, यासाठी अनेक नागरिक, उमरीचे सरपंच आणि इतर राजकीय कार्यकर्त्यांनी सरकार, शासन व प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. माध्यमांद्वारेही तक्रारी मांडण्यात आल्या आहेत. मात्र, अद्याप उड्डाणपुलाच्या बांधकामाला सुरुवात झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

आणखी किती जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार? असा सवाल उपस्थित करत सालई फाट्यावर तातडीने उड्डाणपूल उभारण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

या मागणीसाठी ग्रामस्थांनी संबंधित विभागांकडे तसेच आमदार डॉ. आशीष देशमुख यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. या ठिकाणी तांत्रिक सर्वेक्षण करून योग्य तो उपाय शोधण्यात यावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

उड्डाणपुलाची उभारणी झाल्यास वाहतूक अधिक सुरक्षित होऊन अपघातांची शक्यता कमी होईल, असा विश्वास ग्रामस्थांना आहे. आता संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधी या मागणीवर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उड्डाणपुलाचे बांधकाम तातडीने सुरू न झाल्यास या मार्गावर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही माध्यमांद्वारे देण्यात आला आहे.

मंगेश उराडे | एनटीव्ही न्यूज मराठी | नागपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *