नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील दाढेरा येथे शेतातील विहिरीत एक बिबट्या आणि तीन रानडुकरे पडल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेत दोन रानडुकरांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर बिबट्यासह एका रानडुकराला सुरक्षित बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले.
कळमेश्वर तालुक्यातील मौजा दाढेरा येथील शेतकरी रवींद्र मोहतकर यांच्या शेतातील विहिरीत हे वन्यप्राणी पडले होते. घटनेची माहिती मिळताच वन्यप्राण्यांना पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली. वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी आणि नागपूर शहरातून आलेले वन्यजीव बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरू करण्यात आले.
दाढेरा आणि तिडंगी गावातील नागरिकांनीही बचावकार्यात सक्रिय सहभाग घेतला. वनविभागाच्या पथकाने स्थानिकांच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न केले. अखेर दुपारी बिबट्या आणि एका रानडुकराला विहिरीतून सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. मात्र, तीन रानडुकरांपैकी दोन रानडुकरांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
बिबट्याला पुढील उपचार आणि देखरेखीसाठी नागपूर येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये हलविण्यात आले. बचावलेल्या रानडुकराला गंभीर दुखापत नसल्याने त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
हे वन्यप्राणी विहिरीत नेमके कधी आणि कशा प्रकारे पडले, याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
या बचावकार्यात वनपरिक्षेत्र अधिकारी पी. एल. साठवणे, क्षेत्र सहायक के. एस. वाटकर, पी. व्ही. घुगल, ए. एस. कातकडे, डी. के. पडवाल, एम. सी. बोपटे आणि मंगेश पांडे यांच्यासह वन्यजीव बचाव पथकातील सदस्य आणि गावकऱ्यांनी सहभाग घेतला.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शेतातील विहिरींना संरक्षक कठडे किंवा योग्य सुरक्षा व्यवस्था असल्यास अशा दुर्घटना टाळण्यास मदत होऊ शकते.
मंगेश उराडे | एनटीव्ही न्यूज मराठी | नागपूर
