जळगाव जिल्ह्यातील यावल येथील आयडीबीआय बँकेच्या शाखेत शाखा प्रबंधक सुब्रत कुमार दास यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी तालुक्यातील दिव्यांगांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले.
शाखा प्रबंधक सुब्रत कुमार दास हे मूळचे ओडिशा राज्यातील रहिवासी आहेत. त्यांच्या ६० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून यावल येथील आयडीबीआय बँकेत दिव्यांगांचा सन्मान करण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रांतील सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बँक खातेदारांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी यावल तालुक्यातील नायगाव येथील अरुण शामराव पाटील, तसेच सोनवणे सर यांच्यासह बँकेतील दिव्यांग खातेदारांचा सन्मान करण्यात आला. त्यांचे कौतुक करून गुणगौरव करण्यात आला.
या गुणगौरव सोहळ्याप्रसंगी जळगाव बँकेचे क्षेत्रीय अधिकारी पंकज धनश्याम पाटील यांनी आपले विचार मांडले. यावेळी बँकेतील सर्व कर्मचारीवृंद आणि बँक खातेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
