साने गुरुजींच्या जन्मभूमीत विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाल्याने खांदेशाचे ऋण फेडल्याची भावना मनात निर्माण झाली, असे मत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे प्रकल्प संचालक संदीप निंबाजी पाटील यांनी व्यक्त केले. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात असलेल्या पालगड येथे त्यांनी विद्यार्थ्यांना करिअरविषयक मार्गदर्शन केले.

दापोली, रत्नागिरी येथे परमपूज्य साने गुरुजी यांच्या जन्मभूमी असलेल्या पालगड येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना संदीप निंबाजी पाटील यांना भावस्पर्शी अनुभव आला. साने गुरुजी ज्या मातीत जन्मले, ज्या घरात वाढले आणि ज्या ठिकाणी त्यांच्या आईने त्यांच्यावर संस्कार केले, त्याच पवित्र भूमीत विद्यार्थ्यांना करिअरविषयक मार्गदर्शन करण्याची संधी मिळाल्याने मन गहिवरून आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

साने गुरुजी यांनी खांदेशातील अमळनेर परिसरात केलेले शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्य अत्यंत मोलाचे आहे. खांदेशावर त्यांचे मोठे ऋण असून, त्याच महापुरुषाच्या जन्मभूमीतील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करण्याची संधी मिळाली, हे आपले भाग्य असल्याचे संदीप पाटील यांनी सांगितले. “खांदेशाचे ऋण फेडण्याची संधी परमेश्वराने आणि आदरणीय निलेशजी सांबरे यांनी मला कोकणात दिली असावी,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

निलेशजी सांबरे यांच्या संकल्पनेतून जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र विभाग रत्नागिरी यांच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांपासून ‘हम होंगे कामयाब’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील नऊही तालुक्यांमधील ग्रामीण आणि दुर्गम भागांतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध वाटा, स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण, प्रवेश प्रक्रिया आणि शैक्षणिक नियोजन याबाबत मार्गदर्शन केले जाते.

विद्यार्थ्यांमधील न्यूनगंड दूर करणे, आत्मविश्वास निर्माण करणे, पालक व शिक्षकांशी संवाद साधणे आणि विद्यार्थ्यांना स्वतःच्या क्षमतेची जाणीव करून देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

या उपक्रमांतर्गत दापोली तालुक्यातील अनेक शाळांमध्ये कार्यक्रम घेण्यात आले. भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या मूळगावातील शैक्षणिक संस्थेतही विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. साने गुरुजी, महर्षी कर्वे आणि इतर महान व्यक्तिमत्त्वांच्या कार्याने समृद्ध झालेल्या या भूमीतील विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवा, सैन्यदल, विज्ञान, वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षण, कला, उद्योग आणि इतर क्षेत्रांत यश मिळवावे, अशी अपेक्षा संदीप पाटील यांनी व्यक्त केली.

कोकणातील अनेक तरुणांना रोजगाराच्या मर्यादित संधींमुळे स्थलांतर करावे लागते. मात्र, योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थीही विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश मिळवू शकतात. विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यांना योग्य दिशा देणे आवश्यक आहे. या मोहिमेच्या माध्यमातून कोकणात लाखो वह्यांचे वितरण करण्यासोबतच विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधण्याचे कार्यही सुरू आहे.

निलेशजी सांबरे यांनी या कार्यासाठी आवश्यक यंत्रणा, सहकार्य आणि पाठबळ उपलब्ध करून दिल्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी काम करण्याची संधी मिळत असल्याचे संदीप पाटील यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, त्यांना करिअरची योग्य दिशा देणे आणि त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडविण्याच्या प्रक्रियेत सहभागी होणे, हे मोठे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.

दापोली तालुक्यात जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक व सामाजिक कार्याचा विस्तार करण्याचा संकल्प असून, विद्यार्थ्यांना आवश्यक मार्गदर्शन, शैक्षणिक सहकार्य आणि संधी उपलब्ध करून देण्यासाठी संस्था प्रयत्नशील राहणार आहे.

साने गुरुजींच्या विचारांचा वारसा पुढे नेत ग्रामीण विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देण्याचे कार्य अखंड सुरू ठेवणे, हीच त्या महान व्यक्तिमत्त्वाला आणि या भूमीला वाहिलेली खरी कृतज्ञता असल्याचे मत संदीप निंबाजी पाटील यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *