जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पहूर येथे ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ आदिवासी लाभार्थी मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यात जामनेर येथे मुलींचे वसतिगृह, तर कुंभारी येथे पोलीस प्रशिक्षण केंद्र उभारण्याची घोषणा करण्यात आली. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, उत्कृष्ट आश्रमशाळांचा गौरव आणि महिला बचत गटांना आर्थिक सहाय्याचे वितरण करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत आयोजित हा मेळावा पहूर येथील माळी समाज मंगल कार्यालयात पार पडला. तडवी-भिल्ल समाजातील नागरिकांना विविध शासकीय कल्याणकारी योजनांची माहिती व मार्गदर्शन देणे हा या मेळाव्याचा प्रमुख उद्देश होता.
कार्यक्रमाला राज्याचे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) तसेच आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके होते. पसमंदा मुस्लिम समाज अभ्यास समितीचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री दर्जा प्राप्त इद्रिस मुलतानी, जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, अपर आयुक्त दिनकर पावरा, उपायुक्त हिवाळे व नीलेश अहिरे तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावलचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्यासह विविध अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी प्रास्ताविकातून पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनांची माहिती पोहोचविणे, आवश्यक पात्रता निकष व कागदपत्रांबाबत मार्गदर्शन करणे आणि नागरिकांना योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करणे, हा मेळाव्याचा उद्देश असल्याचे सांगितले.
मंत्री गिरीश महाजन यांनी आदिवासी बांधव आणि महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके यांनी आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. महिला बचत गटांसाठी आर्थिक सहाय्य, स्वयंरोजगाराच्या संधी तसेच शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहांमधून विद्यार्थ्यांना उपलब्ध होणाऱ्या सुविधांवर त्यांनी प्रकाश टाकला.
जामनेर येथे मुलींचे वसतिगृह, कुंभारी येथे पोलीस प्रशिक्षण केंद्र
आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके यांनी जामनेर येथे मुलींसाठी वसतिगृह सुरू करण्याबाबत, तर कुंभारी येथे पोलीस प्रशिक्षण केंद्र उभारण्याबाबत घोषणा केली. यामुळे आदिवासी विद्यार्थिनींना शिक्षणासाठी निवासाची सुविधा आणि पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या आदिवासी युवकांना प्रशिक्षणाची संधी मिळण्याची अपेक्षा आहे. आदिवासी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यावरही त्यांनी भर दिला.
महिला बचत गटांच्या स्टॉलचे आकर्षण
मेळाव्यात महिला बचत गटांनी व्यवसाय व उत्पादनांचे स्टॉल उभारले होते. या स्टॉलवर महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तू आणि खाद्यपदार्थांचे प्रदर्शन व विक्री करण्यात आली. महिलांच्या व्यवसायांची वैशिष्ट्ये, उत्पादनांची माहिती आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपस्थितांना सांगण्यात आल्या.
कार्यक्रमात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. ‘सुंदर माझी शाळा’ अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळांना प्रथम व द्वितीय क्रमांकाची पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. तसेच महिला बचत गटांना आर्थिक सहाय्याचे वितरण करण्यात आले.
यावेळी मंत्री प्रा. अशोक उईके यांनी राज्यात सुमारे ६८ हजार महिला बचत गट स्थापन झाल्याची माहिती दिली. आदिवासी महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविणे, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणे, यावर शासनाचा भर असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहुरे यांनी केले.
शासकीय योजनांची माहिती थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे, पात्र नागरिकांना योजनांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन करणे आणि शासन व नागरिक यांच्यातील समन्वय दृढ करणे, या दृष्टीने हा मेळावा महत्त्वपूर्ण ठरला.
