जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील फैजपूर येथे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने ‘मत वाचवा, देश वाचवा! संविधान वाचवा, लोकशाही वाचवा’ अभियानांतर्गत जनजागृती पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत धनंजय चौधरी सहभागी झाले. यावेळी निवडणूक प्रक्रिया, मतदार याद्यांतील कथित अनियमितता आणि मतदानाच्या अधिकाराबाबत नागरिकांशी संवाद साधण्यात आला.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेतील कथित अनियमितता, पात्र मतदारांची नावे वगळली जाण्याची भीती, मतचोरीचे आरोप आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेचा अभाव या विषयांवर माहिती देण्यात आली.
यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भारतीय संविधानातील अनुच्छेद ३२६ चे सामूहिक वाचन करण्यात आले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये प्रत्येक पात्र भारतीय नागरिकाचा मतदानाचा अधिकार सुरक्षित राहण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
मतदानाचा अधिकार हा लोकशाहीचा पाया असून, निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक आणि विश्वासार्ह असावी, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. या पदयात्रेत फैजपूर शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले.
