हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई आणि चारा टंचाई टाळण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. पंचायत समिती सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी विविध उपाययोजनांचा आढावा घेतला.

बुधवार, २१ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी केशव गड्डापोड, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार सारंग चव्हाण आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

प्रत्येक ग्रामपंचायतीने किमान १०० जलतारांची निर्मिती करावी, जलसंवर्धनाला प्राधान्य द्यावे आणि कुरण लागवडीतून पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता वाढवावी, असे निर्देश देण्यात आले. जिल्ह्याबाहेर चारा वाहून नेण्यावरील बंदी प्रभावीपणे लागू करणे आणि पाण्याचा अनधिकृत उपसा रोखण्याची जबाबदारीही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली.

गावातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दर शुक्रवारी बैठक घेऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. गैरहजर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणीटंचाई उद्भवू नये, यासाठी जलसाठ्यांचे संरक्षण आणि दीर्घकालीन नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

नंदू परदेशी | एनटीव्ही न्यूज मराठी | वसमत, हिंगोली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *