जळगाव पोलिस दलाच्या श्वानपथकात ‘शौर्य’ या प्रशिक्षित श्वानाचा समावेश झाला आहे. पुणे येथील सीआयडीच्या डॉग ट्रेनिंग सेंटरमध्ये नऊ महिन्यांचे कठोर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर शौर्य जळगाव पोलिस दलात दाखल झाला असून, गुन्ह्यांच्या तपासात तो पोलिसांना मदत करणार आहे.

बेल्जियन मॅलिनॉइस जातीच्या शौर्यची जळगाव पोलिस दलाने ६५ हजार रुपये खर्चून खरेदी केली आहे. चपळता, बुद्धिमत्ता आणि तीक्ष्ण घ्राणशक्तीसाठी ओळखल्या जाणाऱ्या या जातीतील श्वानाची गुन्हे शोधक श्वान म्हणून निवड करण्यात आली आहे.

गुन्ह्यांच्या ठिकाणांहून माग काढणे, संशयास्पद ठिकाणांचा शोध घेणे आणि तपास पथकाला आवश्यक मदत करणे, अशी जबाबदारी शौर्य पार पाडणार आहे. त्याने नऊ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर जळगाव पोलिस दलात हजेरी लावली आहे.

शौर्यचा प्रथम हँडलर म्हणून पीएन/१९० प्रशांत कंकरे, तर द्वितीय हँडलर म्हणून एचसी/२९९९ सत्यवान वारंगे यांची नियुक्ती नमूद करण्यात आली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शौर्य गुन्हे शोधक पथकात काम करणार आहे.

शौर्यचा जन्म १ ऑगस्ट २०२४ रोजी झाला असून, त्याला गुन्हे तपासाशी संबंधित कामांसाठी प्रशिक्षित करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *