नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील युवा पत्रकार आणि साप्ताहिक त्रिसंगम वार्ताचे संपादक शेख असलम यांना ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार-२०२६’ प्रदान करण्यात आला. पत्रकारितेच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न मांडण्यासोबतच सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाची दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात आले.

महेक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, निमटेक यांच्या वतीने गुरुवार, दि. २२ ऑक्टोबर रोजी उमरी येथील अहिल्यादेवी होळकर सभागृहात राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात शेख असलम यांना सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

शेख असलम यांनी प्रतिकूल परिस्थितीतून मार्गक्रमण करत पत्रकारितेच्या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्यांनी दैनिक साहित्य सम्राट, कुलस्वामिनी संदेश, दैनिक भास्कर, तरुण भारत आणि दैनिक एकमत यांसारख्या विविध वृत्तपत्रांत काम केले आहे. या प्रवासात स्थानिक प्रश्न, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या आणि सामाजिक विषयांना वाचा फोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

पत्रकारितेसोबतच त्यांनी रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, कोरोना महामारीच्या काळातील सेवाकार्य, अन्नदान आणि गरजू रुग्णांना मदत अशा विविध सामाजिक उपक्रमांत सहभाग घेतला आहे. पत्रकार संरक्षण समितीचे देगलूर तालुकाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले असून, पत्रकार आणि पोलिसांच्या कार्याचा गौरव करणाऱ्या उपक्रमांत सहभाग नोंदविला आहे.

त्यांच्या पत्रकारितेतील कार्याची आणि सामाजिक योगदानाची दखल घेत त्यांची या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.

या पुरस्कार सोहळ्यास महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अभिनेत्री डॉ. गायत्रीताई रामटेके, उमरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेख आरिफ निमटेककर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते शेख असलम यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या सन्मानाबद्दल देगलूर परिसरातील पत्रकारिता क्षेत्रातील सहकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध स्तरांतील मान्यवरांकडून शेख असलम यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *