यावल नगरपरिषदेच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. प्रभाग क्रमांक ५-अ चे नगरसेवक शेख निसार हमीद यांना जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी अपात्र घोषित केले असून, या निर्णयामुळे नगरपरिषदेतील राजकीय समीकरणांवर परिणाम झाला आहे.

यावल येथील उमेश रेवा फेगडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर सुनावणी घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय दिला. २०२५ च्या नगरपरिषद निवडणुकीत शेख निसार हमीद यांनी सादर केलेल्या शपथपत्रात १२ सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेल्या अपत्यांची संख्या शून्य नमूद केली होती. मात्र, त्यांच्या चौथ्या अपत्याचा जन्म ६ जून २००३ रोजी झाल्याचा दावा तक्रारदाराने केला होता.

सुनावणीदरम्यान यावल नगरपरिषदेच्या जन्मनोंदवहीत आणि दोन शाळांच्या अभिलेखांत संबंधित अपत्याची जन्मतारीख ६ जून २००३ असल्याचे आढळले. या नोंदीत माहिती देणारी व्यक्ती म्हणून शेख निसार हमीद यांचे नाव व स्वाक्षरी असल्याचेही समोर आले.

दरम्यान, संबंधित अपत्याचा जन्म २९ ऑगस्ट २००१ रोजी भुसावळ येथे झाल्याचा दावा करत हमीद यांनी भुसावळ नगरपरिषदेची नोंद आणि हॉस्पिटलचा अहवाल सादर केला होता. यावलमधील जन्मनोंद चुकीची असून ती रद्द करण्यासाठी अर्ज केल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, जन्मनोंद रद्द करण्याची प्रक्रिया अंतिम झाली नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यमान अधिकृत नोंद ग्राह्य धरली आणि उमेश फेगडे यांचा अर्ज मंजूर करत शेख निसार हमीद यांना अपात्र घोषित केले.

या निर्णयामुळे भाजपाचे आठ नगरसेवक, एका अपक्ष नगरसेवकासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे तीन नगरसेवक, असे एकूण १२ नगरसेवक एका बाजूला आहेत. दुसरीकडे, लोकनियुक्त नगराध्यक्षांना पाठिंबा देणाऱ्या काँग्रेसच्या नऊ आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या तीन नगरसेवकांचे संख्याबळ १२ होते. मात्र, एका नगरसेवकाच्या अपात्रतेनंतर हे संख्याबळ ११ झाले आहे.

या निर्णयानंतर यावल नगरपरिषदेतील राजकीय घडामोडींकडे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *