जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव खुर्द शिवारात अज्ञात व्यक्तींनी दोन शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे आणि साहित्याचे नुकसान केल्याची घटना समोर आली आहे. एका शेतकऱ्याची तब्बल ५०० केळीची झाडे कापण्यात आली, तर दुसऱ्या शेतकऱ्याची सिंचन पाइपलाइन फोडून तूर पिकाचेही नुकसान करण्यात आले आहे.

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव खुर्द येथील शेतशिवारात अज्ञात व्यक्तींनी धुमाकूळ घालत दोन शेतकऱ्यांच्या पिकांचे आणि साहित्याचे नुकसान केले आहे. या प्रकरणी यावल पोलिसांत अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, किनगाव खुर्द येथील शेतकरी महेश जोगी यांचे मालोद रस्त्यावरील शेतात अज्ञात व्यक्तीने तूर पीक कापून फेकून दिले. तसेच सिंचनासाठी असलेली पाइपलाइनही फोडून टाकली. या घटनेत महेश जोगी यांचे सुमारे पाच हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

दुसऱ्या घटनेत, किनगाव बुद्रुक येथील रहिवासी शेतकरी महेंद्र पाटील यांच्या किनगाव खुर्द शिवारातील मालोद रस्त्यावरील शेतात अज्ञात व्यक्तीने नवतीच्या केळीची तब्बल ५०० झाडे कापून फेकून दिली. यामुळे महेंद्र पाटील यांचे सुमारे २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

या दोन्ही घटनांमध्ये शेतकऱ्यांचे एकूण २५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी महेश जोगी यांच्या फिर्यादीवरून यावल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप सूर्यवंशी या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *