बीड जिल्ह्यातील आष्टी पोलिसांनी डिझेल चोरी करणाऱ्या टोळीविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. ४५० लिटर डिझेल, अकरा ड्रम आणि चोरीसाठी वापरली जाणारी वाहने जप्त करण्यात आली असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत बीएमडब्ल्यू कारचाही समावेश असल्याने परिसरात चर्चा सुरू आहे.
२४ ऑक्टोबर रोजी सकाळी सहाच्या सुमारास आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार नागेश लोमटे यांना डिझेल चोरी करणारी टोळी सक्रिय असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यांनी ही माहिती प्रभारी अधिकारी तथा परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भारत पांढरे यांना दिली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक नाना सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने कारवाई सुरू केली.
सकाळी सातच्या सुमारास जामखेड–आष्टी मार्गावरील चिंचपूर गावाजवळ काळ्या काचा असलेल्या विनानंबरच्या स्विफ्ट कारचा पाठलाग करून पोलिसांनी ती थांबवली. यावेळी पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या गोविंद पोपट शिरसाट, रा. मातकुळी, ता. आष्टी, याला पोलिसांनी पकडले.
कारची झडती घेतली असता, अकरा ड्रममध्ये सुमारे ४०० ते ४५० लिटर डिझेल आढळले. डिझेल काढण्यासाठी वापरण्यात येणारी मोटार आणि पाइपही जप्त करण्यात आले. या प्रकरणात सिद्धांत यादव, रा. मातकुळी, यालाही ताब्यात घेण्यात आले असून, दोघांना अटक करण्यात आली आहे.
पुढील तपासादरम्यान डिझेल चोरीच्या गुन्ह्यांत वापरल्याचा संशय असलेली आणखी तीन चारचाकी वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली. यामध्ये बीएमडब्ल्यू कारचाही समावेश आहे. या आरोपींचे अहिल्यानगरसह इतर जिल्ह्यांतील डिझेल चोरीच्या गुन्ह्यांशी संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून, आणखी किती गुन्हे उघडकीस येतात, याचा तपास सुरू आहे.
प्रभारी अधिकारी तथा परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भारत पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नाना सूर्यवंशी, पोलीस अंमलदार नागेश लोमटे, अमोल नवले, भारत गुजर, नवनाथ पाखरे, नितीन काकडे, विलास गुंडाळे, अक्षय लोंढे, सचिन शीरसागर आणि दादा येळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास पोलीस हवालदार अमोल नवले करीत आहेत.
