किरीट सोमय्यांच्या वक्तव्याचा वंचितकडून निषेध

वस्तुस्थिती तपासून वक्तव्य करण्याची मागणी

किनगाव प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीचा आग्रह

पथसंचलनाच्या परवानगी प्रक्रियेची चौकशी करा

महिलांवरील लाठीचार्जच्या चौकशीची मागणी

सामाजिक सलोखा राखण्याचे शमीभा पाटील यांचे आवाहन

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या वक्तव्याचा वंचित बहुजन आघाडीच्या जळगाव पूर्व जिल्हाध्यक्ष शमीभा पाटील यांनी निषेध करत, वस्तुस्थितीची पडताळणी करूनच वक्तव्य करावे, अशी भूमिका मांडली आहे.

JALGAON | जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनावर दगडफेक झाल्याच्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या वक्तव्याचा वंचित बहुजन आघाडीच्या जळगाव पूर्व जिल्हाध्यक्ष शमीभा पाटील यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
स्थानिक परिस्थितीची संपूर्ण माहिती न घेता, प्रत्यक्ष घटनाक्रम समजून न घेता आणि उपलब्ध पुराव्यांची पडताळणी न करता सार्वजनिक वक्तव्ये करणे, तसेच या प्रकरणाला हिंदू-मुस्लिम संघर्षाचे स्वरूप देण्याचा प्रयत्न करणे, हा सामाजिक सलोख्याच्या दृष्टीने गंभीर प्रकार असल्याचे शमीभा पाटील यांनी म्हटले आहे.
किनगाव येथे प्रत्यक्ष भेट देऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांकडून मिळालेली माहिती, स्वतः पाहिलेल्या घटना आणि उपलब्ध व्हिडिओंच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणातील सर्व बाबींची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या प्रकरणात सहा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. किरीट सोमय्या यांच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर दगडफेकीच्या दाव्यांची वस्तुनिष्ठ पडताळणी करून अधिकृत माहिती जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच पथसंचलनाच्या मार्गाची निवड आणि परवानगी देण्याच्या प्रक्रियेची चौकशी करावी, तडवी आदिवासी तरुणांवरील गुन्ह्यांचा आधार आणि पोलिसांच्या कारवाईची कायदेशीरता तपासावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
महिलांवरील लाठीचार्जच्या घटनेची चौकशी करून संबंधित आदेश आणि कारवाईचे तपशील स्पष्ट करावेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, बिरसा मुंडा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांच्या कथित विटंबनेच्या आरोपांची उपलब्ध व्हिडिओ आणि अन्य पुराव्यांच्या आधारे चौकशी करावी, असेही वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे.
संपूर्ण प्रकरणात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या अप्रमाणित दाव्यांना आळा घालून सामाजिक शांतता राखण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती कायदेशीर पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
“किनगावमध्ये सत्य समोर आले पाहिजे; धार्मिक राजकारणासाठी समाजाची शांतता वेठीस धरू नका!” असे म्हणत शमीभा पाटील यांनी किरीट सोमय्या यांच्या वक्तव्याचा निषेध केला. भाजपच्या जातीय-धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणावरही त्यांनी टीका केली. कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा संघटनेने राजकीय भूमिकेसाठी समाजातील शांतता आणि परस्पर विश्वास धोक्यात घालू नये, असे त्यांनी म्हटले.
“आमचा विरोध कोणत्याही धर्माला किंवा समाजाला नाही. आमचा विरोध अप्रमाणित दावे करून सामाजिक तेढ निर्माण करण्याच्या प्रवृत्तीला, अन्यायकारक कारवाईला आणि संविधानिक मूल्यांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही कृतीला आहे. किनगावमधील सत्य निष्पक्ष चौकशीतून समोर आले पाहिजे. समाजामध्ये फूट पाडण्याऐवजी सामाजिक एकता आणि संविधानाचे रक्षण करण्याला प्राधान्य दिले पाहिजे,” अशी भूमिका शमीभा पाटील यांनी मांडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *