जळगाव जिल्ह्यातील एरंडोल पंचायत समितीला नियमित गटविकास अधिकारी मिळाले आहेत. मनोज देव यांनी पदभार स्वीकारला असून, ग्रामीण विकासाची रखडलेली कामे मार्गी लागण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

शहादा पंचायत समितीतून पदोन्नतीवर आलेल्या मनोज देव यांनी २१ ऑक्टोबर २०२६ रोजी एरंडोल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदाचा नियमित पदभार स्वीकारला. त्यांनी मार्च १९९१ मध्ये शासकीय सेवेला सुरुवात केली असून, नंदुरबार तालुक्यात विविध पदांवर काम केले आहे. शहादा येथे त्यांनी सलग चार वर्षे विस्तार अधिकारी म्हणून सेवा बजावली.

पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी जलसंधारण, घरकुल योजना आणि ग्रामपंचायतींच्या विकासकामांना प्राधान्य देण्याचे नियोजन केले आहे.

‘व्ही. जी. रामजी योजने’अंतर्गत ४ हजार जलतारा कामांना मंजुरी मिळवून ती वेळेत पूर्ण करणे, विहीर पुनर्भरण, रेन वॉटर हार्वेस्टिंग, तलावांतील गाळ काढणे आणि नाला खोलीकरण यावर भर दिला जाणार आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेतील नवीन कामे सुरू करून अपूर्ण घरकुले पूर्ण करणे, तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायतींची विकासकामे वेळेत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात आले.

मनोज देव यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन एरंडोल तालुक्यातील ग्रामीण विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *