जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात आडगाव केंद्रस्तरीय शिक्षण परिषद जानफळ येथे उत्साहात पार पडली. ग्रामीण विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास आणि शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी गटशिक्षणाधिकारी आर. डी. महाजन यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले.
जानफळ येथील शाळेत एरंडोल पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी आर. डी. महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आडगाव केंद्रस्तरीय शिक्षण परिषद पार पडली. कार्यक्रमाची सुरुवात भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली.
ग्रामीण विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहावे आणि शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणातून विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास साधावा, असे आवाहन आर. डी. महाजन यांनी केले.
मुख्याध्यापक अशोक पाटील यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या आणि गुणवत्ता वाढीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. शालेय पोषण आहार अधीक्षक जे. डी. पाटील यांनी पोषण आहारासंदर्भातील नियमावली स्पष्ट केली, तर शिक्षक विनोद सपकाळे यांनी मूल्यवर्धित शिक्षणाचे महत्त्व सांगितले.
केंद्रप्रमुख नितीन पाटील यांनी निपुण महाराष्ट्र अभियान, पाठनियोजन, मूल्यवर्धन उजळणी प्रशिक्षण तसेच राज्यस्तरीय धोरणे आणि स्थानिक विषयांवर मार्गदर्शन केले.
यावेळी एरंडोल तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रमोद पाटील चिलाणेकर, नवनिर्वाचित केंद्रप्रमुख सचिन हळीगे, प्रमोद काकूळीद यांच्यासह मुख्याध्यापक आणि शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन राकेश पाटील यांनी केले, तर आभार अशोक पाटील यांनी मानले.
