जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील डोणगाव येथे महावितरणने वीजचोरीविरोधात धडक मोहीम राबवली. या कारवाईत तब्बल ३० ठिकाणी थेट विद्युत वाहिनीवर आकडे टाकून वीजचोरी होत असल्याचे उघड झाले.
डोणगाव परिसरात अधिकृत वीजजोडणी न घेता थेट वीजवाहिनीवर आकडे टाकून वीज वापरली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर डांभुर्णी कक्षातील महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विशेष तपासणी मोहीम राबवली.
यावल उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता सुहास चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत ३० ठिकाणांवरील अनधिकृत वीजजोडण्या हटवण्यात आल्या. तसेच केबल, वायर आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. संबंधितांना अधिकृत वीजजोडणी घेण्याच्या सूचना आणि नोटीस देण्यात आली.
ही कारवाई यापुढेही दररोज सुरू राहणार असल्याची माहिती डांभुर्णी कक्षाचे कनिष्ठ अभियंता राहुल निकम यांनी दिली.
या पथकात कक्षप्रमुख राहुल निकम, लाईनमन दिनेशसिंग पाटील, वरिष्ठ तंत्रज्ञ गिरीश बऱ्हाटे, विष्णू येशी, बाह्यस्रोत कर्मचारी जयेश बेंडाळे, भूषण साळुंख, सुयोग कोळंबे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
