पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन येथे पहाटे भीषण अपघात झाला. अज्ञात वाहनाच्या धडकेत यवतच्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे.
सोमवारी पहाटे ३ ते ३:३० वाजण्याच्या सुमारास खेडेकर मळा परिसरातील मातोश्री हॉटेलसमोर हा अपघात घडला.
श्रावण सुरेश कतारी आणि रोहित बाळू काळे हे दोघे मित्र पुण्याहून यवतला दुचाकीने परतत असताना भरधाव अज्ञात ट्रक किंवा टेम्पोने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली.
या अपघातात श्रावण कतारी याचा जागीच मृत्यू झाला, तर रोहित काळे गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच संतोष झोंबाडे, रतन चव्हाण आणि माऊली लाड यांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, अपघातानंतर अज्ञात वाहनचालक पसार झाला. उरुळी कांचन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही आणि टोल नाक्यावरील फुटेजच्या आधारे वाहनाचा शोध सुरू आहे.
श्रावणच्या अकाली मृत्यूमुळे यवतसह दौंड तालुक्यात शोककळा पसरली आहे.
