जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील चुंचाळे गावाजवळ असलेल्या गायरान आदिवासी वस्तीवर दुर्दैवी घटना घडली. पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या २६ वर्षीय महिलेचा चक्कर येऊन कोसळल्यानंतर मृत्यू झाला.
सुरेखा दिनेश बारेला (वय २६) या चुंचाळे गावापासून सातपुड्याच्या दिशेने असलेल्या गायरान आदिवासी वस्तीवर कुटुंबासह राहत होत्या. त्या पाच महिन्यांच्या गर्भवती होत्या. त्यांना दोन दिवसांपासून त्रास जाणवत होता. शनिवारी रात्रीही त्रास होत असल्याने सकाळी रुग्णालयात जाण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला होता.
मात्र, रविवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्यांना अचानक चक्कर आली आणि त्या घरातच जमिनीवर कोसळून बेशुद्ध पडल्या. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
याप्रकरणी दिनेश मोहन बारेला यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत्यूचे कारण स्पष्ट होण्यासाठी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदीप सूर्यवंशी पुढील तपास करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
