तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात यावलच्या विद्यार्थ्यांनी आपली चमक दाखवली आहे. गॅलेक्सी कॉम्प्युटर अँड रोबोटिक्स इन्स्टिट्यूटच्या आंतरशालेय रोबोटिक्स स्पर्धेत डॉ. झाकीर हुसेन उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जळगाव जिल्ह्यातील यावल येथील डॉ. झाकीर हुसेन उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजने आंतरशालेय रोबोटिक्स स्पर्धा २०२६ मध्ये घवघवीत यश संपादन करत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. गॅलेक्सी कॉम्प्युटर अँड रोबोटिक्स इन्स्टिट्यूट, यावल यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत तालुक्यातील अनेक शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. डॉ. झाकीर हुसेन उर्दू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना, उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य आणि कल्पकतेच्या जोरावर उपस्थितांची मने जिंकत शाळेचे नाव उंचावले.
या यशाबद्दल संस्थेच्या आणि शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल नॅशनल एज्युकेशन सोसायटी, यावलचे अध्यक्ष हाजी शब्बीर खान मोहम्मद खान तसेच सोसायटीच्या सर्व सदस्यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.
शाळेचे प्राचार्य तुफेल अहमद अब्दुल हक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांचे मनोबल वाढवले.
विद्यार्थ्यांच्या या यशामुळे संपूर्ण यावल परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
