आदिवासी बांधवांसाठी यावल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाकडून सात विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. व्यवसाय, शेती, बचत गट, क्रीडा आणि पारंपरिक वनऔषधी संवर्धनासाठी आर्थिक मदत मिळणार असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२६ आहे.
यावल येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पामार्फत सन २०२६-२७ या वर्षासाठी आदिवासी बांधवांसाठी सात योजना राबविण्यात येत आहेत. यासाठी जळगाव जिल्ह्यातील पात्र अनुसूचित जमातीच्या नागरिकांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.
महिलांसाठी राणी लक्ष्मीबाई योजनेतून ८० महिलांना, तर पुरुषांच्या व्यवसाय योजनेतून १०० जणांना लाभ मिळणार आहे. वनपट्टेधारक ४० शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी मदत दिली जाणार आहे.
तसेच MAVIM आणि आत्मा अंतर्गत तीन वर्षांपासून कार्यरत असलेल्या १५ बचत गटांना सामूहिक व्यवसायासाठी अनुदान मिळणार आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, व्हिडिओ मेकर आणि फोटोग्राफर यांनाही व्यवसायासाठी मदत दिली जाणार आहे.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जाणाऱ्या २० खेळाडूंना क्रीडा साहित्य व तयारीसाठी, तर २० पारंपरिक वैदूंना वनऔषधी संवर्धनासाठी साहित्य खरेदीची मदत मिळणार आहे.
या योजनांसाठी अर्जदार अनुसूचित जमाती प्रवर्गातील आणि १८ वर्षांपेक्षा जास्त वयाचा असणे आवश्यक आहे. अर्जासाठी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी दाखला, बँक पासबुक, पॅन कार्ड, मोबाईल नंबर, ग्रामसभा किंवा नगरपालिका ठराव आणि यापूर्वी योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
यामध्ये तीन टक्के दिव्यांग आणि ३३ टक्के महिला आरक्षण असून, विधवा, परित्यक्ता आणि निराधार महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे.
अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून, ऑफलाइन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. इच्छुकांनी www.nbtribal.in या संकेतस्थळावर ३० नोव्हेंबर २०२६ पूर्वी अर्ज करावेत.
पात्र आदिवासी बांधवांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी अरुपा पवार यांनी केले आहे.
