संकटग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा; प्रत्येक पात्र शेतकऱ्याला ५ हजार रुपयांची अग्रीम मदत

अहिल्यानगर  : अहिल्यानगर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांसमोरील आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली आहे. जिल्ह्यातील सुमारे ८ लाख ७ हजार २८४ शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये प्रत्येकी ५ हजार रुपयांप्रमाणे एकूण ४०३ कोटी ६४ लाख रुपयांची अग्रीम मदत जमा करण्यात आली आहे. ही माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा सातत्याने आढावा घेऊन शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, यासाठी शासनस्तरावर करण्यात आलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.

जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये पावसाने दिलेली ओढ, पिकांचे झालेले नुकसान, घटलेले उत्पादन आणि शेतीच्या वाढत्या खर्चामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजार रुपयांची अग्रीम मदत देण्याची घोषणा केली होती.

दुष्काळाची गंभीरता लक्षात घेऊन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात टंचाई आढावा बैठका घेतल्या. या बैठकांमधून तालुकानिहाय परिस्थितीचा आढावा घेऊन त्याचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करण्यात आला. तसेच आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या होत्या.

राज्य सरकारने जाहीर केलेल्या मदतीच्या पहिल्याच टप्प्यात अहिल्यानगर जिल्ह्याचा समावेश झाल्याने शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत उपलब्ध झाली. शासनाने थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रक्रियेद्वारे जिल्ह्यातील ८ लाख ७ हजार २८४ शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये एकूण ४०३ कोटी ६४ लाख रुपये वर्ग केले आहेत.

शेतकऱ्यांवर संकट आले असताना केवळ आश्वासन न देता त्यांना प्रत्यक्ष आर्थिक मदत मिळवून देणे आवश्यक आहे, ही भूमिका पालकमंत्री विखे पाटील यांनी सातत्याने मांडली आहे. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, जनावरांसाठी चारा, वीजपुरवठा आणि शेतीच्या नुकसानीसंदर्भात प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांचाही ते सातत्याने आढावा घेत आहेत.

या आर्थिक मदतीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या तातडीच्या गरजा भागविण्यासाठी मोठा आधार मिळणार आहे. तसेच आगामी शेती हंगामाच्या तयारीसाठीही या रकमेचा उपयोग होऊ शकणार आहे. जिल्ह्यातील उर्वरित पात्र लाभार्थ्यांपर्यंतही मदत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *