यावल एसटी आगाराचे भाग्य उजळणार असून वर्षभरात २५ नवीन बसेस दाखल होणार आहेत. आमदार अमोल जावळे यांच्या पाठपुराव्याला यश आले असले, तरी यावल बसस्थानकाच्या नूतनीकरणाचा प्रश्न अद्याप कायम आहे.
आमदार अमोल जावळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे यावल आगाराला वर्षभरात टप्प्याटप्प्याने २५ नवीन बसेस मिळणार आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून जुन्या बसेस आणि बसफेऱ्यांच्या कमतरतेमुळे विद्यार्थी, नोकरदार आणि प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत होता.
नवीन बसेस दाखल झाल्यानंतर बसफेऱ्या वाढण्यासह प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाची सुविधा मिळण्याची अपेक्षा आहे.
मात्र, आता यावल बसस्थानकाच्या नूतनीकरणाची मागणी जोर धरत आहे. स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, बसण्याची व्यवस्था आणि निवारा शेड यांची दुरवस्था झाली असून प्रवाशांना उन्हात आणि पावसात उभे राहावे लागत आहे.
त्यामुळे बसस्थानकाचे नूतनीकरण करून आधुनिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून आमदार अमोल जावळे यांच्याकडे करण्यात आली आहे. या मागणीसाठीही पाठपुरावा करण्याचे आश्वासन आमदारांनी दिले आहे.
