यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील कुपटी येथील शासकीय टेकडीवर अनधिकृत उत्खनन आणि वृक्षतोड झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. अमृत सरोवर योजनेच्या नावाखाली कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करत विभागीय आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
उमरखेड तालुक्यातील मौजा कुपटी येथील गट क्रमांक ४९ मधील शासकीय ई-वर्ग जमिनीवरील नैसर्गिक टेकडीचे सपाटीकरण, वृक्षतोड तसेच मोठ्या प्रमाणात मुरूम आणि गौणखनिज उत्खनन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पत्रकारिता व माहिती अधिकार कार्यकर्ते तथा उमरखेड वार्ताचे मुख्य संपादक शेख इरफान शेख ईसा यांनी १२ नोव्हेंबर २०२६ रोजी विभागीय आयुक्त, अमरावती यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीत ग्रामपंचायत कुपटीचे २४ मार्च २०२५ आणि २२ मे २०२५ रोजीचे ठराव, खासगी व्यक्तींचे कंत्राटदार कंपनीसोबतचे कथित करारनामे, गौणखनिज उत्खननाच्या परवानग्या आणि वन विभागाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. गट क्रमांक ४९ मधून अंदाजे अडीच ते पाच लाख ब्रास गौणखनिज उत्खनन झाल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्ष प्रमाण अधिकृत मोजणी आणि चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.
शासकीय जमिनीची मालकी, उत्खनन परवानगी, वाहतूक, रॉयल्टी, सातबारा, फेरफार नोंदी, वृक्षतोडीचे अभिलेख आणि आर्थिक व्यवहारांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दोषी आढळल्यास सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, कंत्राटदार तसेच महसूल आणि वन विभागातील संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर महसुली, विभागीय व फौजदारी कारवाई करावी. भ्रष्टाचाराचे पुरावे आढळल्यास प्रकरण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे पाठवावे, अशीही मागणी तक्रारदारांनी केली आहे.
शासकीय टेकडीचे अस्तित्व, गौणखनिजाचा व्यवहार आणि शासनाच्या महसुलाचे नुकसान नेमके किती झाले, हे उच्चस्तरीय चौकशीतून स्पष्ट करावे, अशी मागणी शेख इरफान शेख ईसा यांनी केली आहे. आता विभागीय आयुक्त प्रशासनाच्या भूमिकेकडे उमरखेड तालुक्याचे लक्ष लागले आहे.
