अकोल्यात बनावट नंबरप्लेटच्या माध्यमातून दुचाकी चोरीचा प्रकार समोर आला आहे. एकाच क्रमांकाचा वापर करून फिरणाऱ्या दोन मोटारसायकली स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केल्या असून, आंतरजिल्हा दुचाकी चोरट्याला अटक केली आहे. पोस्ट ऑफिस परिसरातून चोरीला गेलेल्या दुचाकीचा तपास करताना ही बनावटगिरी उघडकीस आली.
अकोल्यातील पोस्ट ऑफिस परिसरातून दुचाकी चोरीला गेल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने महत्त्वाची कारवाई केली आहे.
सुधीर कॉलनीतील संजय देवीदास ठोंबरे यांनी १३ नोव्हेंबर २०२६ रोजी आपली हिरव्या रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर पोस्ट ऑफिस परिसरात उभी केली होती. शासकीय कामानिमित्त अकोटला जाऊन सायंकाळी परतल्यानंतर त्यांना दुचाकी गायब असल्याचे आढळले. याप्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
एलसीबीच्या समांतर तपासादरम्यान चोरीची दुचाकी अशोक वाटिका चौकात फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून मंगेश कशनदास राठोड (वय २७, रा. जनुना, पोस्ट पिंजर, ता. बार्शीटाकळी, जि. अकोला) याला ताब्यात घेतले.
दुचाकीच्या इंजिन क्रमांक, चेसिस क्रमांक आणि कंपनीच्या खुणांची पडताळणी केली असता ती संजय ठोंबरे यांचीच चोरी गेलेली दुचाकी असल्याचे स्पष्ट झाले.
पुढील चौकशीत याच क्रमांकाची आणखी एक दुचाकी मूर्तिजापूर येथे वापरली जात असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी ती दुसरी दुचाकीही जप्त केली. अशा प्रकारे एकाच क्रमांकाच्या दोन दुचाकी वापरून चोरीची ओळख लपविण्याचा प्रकार उघड झाला.
ताब्यातील आरोपी आणि दोन्ही दुचाकी पुढील कायदेशीर कारवाईसाठी सिटी कोतवाली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्या आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाळ जाधव तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र खंदारे, किशोर सोनोने, महिंद्र मलिये, वसीमोद्दीन, मंगेश इंगळे, स्वप्नील खेडकर, अन्सार आणि चालक मनीष ठाकरे यांच्या पथकाने पार पाडली.
