यावल एसटी आगारात २५ नवीन बसेस दाखल झाल्यानंतर प्रवाशांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. यावल ते बुलढाणा व्हाया श्रीक्षेत्र जाळीचा देव अशी नवीन बससेवा सुरू करण्याची मागणी प्रवासी आणि भाविकांकडून होत असून, यासाठी आमदार अमोल जावळे यांनी लक्ष घालावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यावल एसटी आगारात नुकत्याच २५ नवीन बसेस दाखल झाल्याने बससेवेत वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर यावल येथून भुसावळ, जामनेर, फत्तेपूर, वाकडी, शहापूर, गोद्री, धावडा, श्रीक्षेत्र जाळीचा देव मार्गे बुलढाणा अशी नवीन बससेवा सुरू करण्याची मागणी परिसरातील प्रवासी आणि भाविकांकडून होत आहे.
यावल आगारातून यापूर्वी श्रीक्षेत्र सावळतबारा मार्गे बससेवा सुरू होती. मात्र, काही कारणास्तव ती बंद करण्यात आली. त्यामुळे परिसरातील भाविकांसह दैनंदिन प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. आता नवीन बसेस दाखल झाल्याने बंद झालेली सेवा पुन्हा सुरू करण्यासह प्रस्तावित मार्गावर बससेवा सुरू करण्याची मागणी पुढे आली आहे.
या मार्गावर बस सुरू झाल्यास यावल, भुसावळ आणि जामनेर परिसरातील भाविकांना श्रीक्षेत्र जाळीचा देव येथे दर्शनासाठी जाणे सुलभ होईल. तसेच फत्तेपूर, वाकडी आणि शहापूर परिसरातील प्रवाशांना भुसावळ व यावल येथे ये-जा करण्यासाठी थेट बससेवेचा लाभ मिळेल.
पर्यटनस्थळालाही मिळणार चालना
गोद्री ते धावडा दरम्यानच्या डोंगराळ परिसरात जामनेर वन विभागाच्या माध्यमातून ‘डालकीची धार’ हे निसर्गरम्य पर्यटनस्थळ विकसित करण्यात आले आहे. येथे पर्यटकांची संख्या वाढत असून, सार्वजनिक वाहतुकीची सुविधा उपलब्ध झाल्यास पर्यटकांना मोठा दिलासा मिळू शकतो. प्रस्तावित बससेवेमुळे धार्मिक पर्यटनासोबतच निसर्ग पर्यटनालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
सध्या या मार्गावर जामनेर आगाराची एक बससेवा सुरू असल्याची माहिती आहे. मात्र, प्रवाशांची वाढती संख्या आणि परिसरातील गावांची गरज लक्षात घेता यावल आगारातूनही अतिरिक्त बस सुरू झाल्यास विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी, शेतकरी आणि भाविकांची सोय होणार आहे.
यावल आगारात २५ नवीन बसेस उपलब्ध झाल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार अमोल जावळे यांनी या मागणीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून यावल ते बुलढाणा व्हाया श्रीक्षेत्र जाळीचा देव ही बससेवा तातडीने सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
धार्मिक स्थळांना जोडणारी वाहतूक सुविधा, ग्रामीण भागातील प्रवाशांची सोय आणि नव्याने विकसित होत असलेल्या पर्यटनस्थळाला मिळणारी जोडणी या दृष्टीने ही बससेवा सुरू होणे आवश्यक असल्याची भावना परिसरातील प्रवाशांनी व्यक्त केली आहे.
